
रत्नागिरीकरांचा श्वास धुळीने कोंडला!
जयस्तंभ चौकासह प्रमुख मार्गांवर धुळीचे लोट; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
रत्नागिरी : स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट शहराच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी शहरात सध्या धुळीच्या प्रदूषणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. शहरातील प्रमुख चौक आणि वर्दळीच्या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः जयस्तंभ चौक परिसरात धुळीचे लोट उडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, रत्नागिरी नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ चौक हा नेहमीच वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र, सध्या या भागातून प्रवास करणे म्हणजे धुळीचा सामना करण्यासारखे झाले आहे. आंबेडकर पुतळ्यापासून एसटी स्थानकाच्या एका बाजूला जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण अद्याप पूर्ण झालेले नसल्याने या मार्गावर धुळीची समस्या अधिक तीव्र झाली आहे.
पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेल्या सिमेंटसदृश साहित्याचे कण वाऱ्यामुळे हवेत उडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच रस्त्यालगतच्या पदपथांची कामे आणि इतर विकासकामे रखडल्याने परिस्थितीत आणखी भर पडली आहे. या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू झाली की धुळीचे लोट हवेत पसरतात. परिणामी, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना या धुळीचा थेट सामना करावा लागत आहे.
तोंडाला रुमाल, महिलांकडून ओढण्यांचा आधार!
रस्त्यावरील धुळीपासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिक तोंडाला रुमाल बांधून प्रवास करताना दिसत आहेत. महिलांनाही ओढण्यांनी तोंड झाकून या परिसरातून मार्गक्रमण करावे लागत आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
हवेत सतत उडणाऱ्या धुळीमुळे डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, खोकला आणि श्वसनासंबंधी त्रास होण्याचा धोका वाढू शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना या प्रदूषणाचा अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समस्येकडे केवळ रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
या मार्गावरून लोकप्रतिनिधी, नगर परिषदेचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची ये-जा सुरू असते. मात्र, चारचाकी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांना रस्त्यावर उडणाऱ्या धुळीची तीव्रता कदाचित जाणवत नसावी, अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात मात्र दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना या समस्येचा दररोज सामना करावा लागत आहे.
एकीकडे शहराच्या विकासाच्या आणि स्मार्ट सुविधांच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे नागरिकांना धुळीच्या प्रदूषणातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांचा दर्जा, अपूर्ण कामे आणि रस्त्यांच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
हवेची गुणवत्ता तपासण्याची मागणी
शहरातील धुळीच्या वाढत्या समस्येची दखल घेऊन संबंधित प्रदूषण नियंत्रण यंत्रणेने या परिसरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. धुळीचे प्रमाण किती आहे, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो आणि त्यावर कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबत संबंधित यंत्रणांनी स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जात असताना शहरातील प्रमुख रस्त्यांवर धुळीचे प्रदूषण वाढत असल्याची बाब चिंताजनक मानली जात आहे. केवळ विकासकामे सुरू करणे पुरेसे नसून ती वेळेत पूर्ण करणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
नगर परिषदेने तातडीने लक्ष द्यावे!
जयस्तंभ चौक आणि आंबेडकर पुतळा ते एसटी स्थानक परिसरातील धुळीची समस्या तातडीने दूर करावी, अपूर्ण रस्त्यांचे काम पूर्ण करावे, रखडलेल्या पदपथांच्या कामांना गती द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रत्नागिरीकरांना धुळीतून प्रवास करण्याची वेळ का यावी? शहराच्या विकासाबरोबर नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारीही नगर परिषदेने स्वीकारणार की नाही? असा सवाल उपस्थित होत असून, संबंधित प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




