धोकादायक वळणावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक; २१ जण जखमी


चिपळूण-चोरवणे व कासई-चिपळूण मार्गावरील बसचा आंबडसजवळ अपघात; जखमींना कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल


चिपळूण तालुक्यातील आंबडस परिसरातील खांदाट गवळवाडी येथील चिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन २१ जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींमध्ये १८ प्रवासी, दोन चालक आणि एका वाहकाचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूणहून चोरवणेकडे जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणच्या दिशेने येणारी एसटी बस आंबडस परिसरातील खांदाट गवळवाडी येथील धोकादायक वळणावर समोरासमोर आली. त्याचवेळी दोन्ही बसची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने दोन्ही बसमधील अनेक प्रवाशांना दुखापत झाली.

या मार्गावर तीव्र उतार आणि धोकादायक वळण असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांसह संबंधित यंत्रणांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बसमधून बाहेर काढून तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक व हालचालींवर परिणाम झाला होता.

दरम्यान, एसटी महामंडळाचे आगार प्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात एकूण २१ जण जखमी झाले असून त्यामध्ये १८ प्रवासी, दोन चालक आणि एका वाहकाचा समावेश आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button