
चार जिल्ह्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला रत्नागिरीत पुन्हा अटक
रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि रायगड या चार जिल्ह्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार् करण्यात आलेला आरोपी शहरात पुन्हा बेकायदेशीररीत्या वावरताना आढळून आल्याने पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई २४ ऑगस्ट रोजी रात्री २०.१० वाजण्याच्या सुमारास आठवडा बाजार येथील एका हॉस्पिटलसमोर करण्यात आली. अमिर नजीर मुजावर (४० वर्षे, राजिवडा नाका) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
उपविभागीय दंडाधिकारी, रत्नागिरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१) (अ) अन्वये १४ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी अमिर मुजावर याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रायगड या चार जिल्ह्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले होते.



