खेड तालुक्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ; जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीच्या वर

खेड : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. शिरवली, पिंपळवाडी आणि नातुवाडी धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला असून काही धरणांमधून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, जगबुडी नदीची पाणीपातळी अद्यापही इशारा पातळीच्या वर असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिरवली लघु प्रकल्प १०० टक्के भरला असून धरणाची पाणीपातळी ३९.६० मीटरवर पोहोचली आहे. धरणात २.९७८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून सांडव्याद्वारे २.९६६ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पिंपळवाडी लघु प्रकल्पात ६७.३७ टक्के पाणीसाठा झाला असून धरणाची पाणीपातळी १२५.९१ मीटर आहे. धरणातून सांडव्याद्वारे २८.४० घनमीटर प्रति सेकंद तर विमोचकाद्वारे १.७९ घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नातुवाडी मध्यम प्रकल्पात ६७.४९ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला असून धरणाची पाणीपातळी ८७.६९ मीटर आहे. धरणातून सांडव्याद्वारे ५.११९ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून विमोचकाद्वारे कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
दरम्यान, सायंकाळी ४ वाजेपर्यंत भरणे नाका येथील जगबुडी नदीची पाणीपातळी ५.२० मीटर इतकी नोंदविण्यात आली. नदीची इशारा पातळी ५.०० मीटर तर धोका पातळी ७.०० मीटर असल्याने जगबुडी नदी अद्यापही इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी आणि सखल भागातील रहिवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button