
ठाकर लोककलांचा वारसा टिकविण्यासाठी अन्य समाजातील युवकांनीही पुढे यावे चित्रकथी कलाकार बाळकृष्ण मसगे यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. २७: तुटपुंज्या उत्पन्नामुळे ठाकर समाजातील नव्या पिढीची उदासिनता, कलाकारांची कमी होत असलेली संख्या यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूषण असलेली ठाकर लोककला अस्तंगत होण्याच्या टप्प्यावर आहे. ही कला टिकायची असेल तर सर्वच समाजातील युवकांनी पुढे येऊन या कलांचे प्रशिक्षण घेऊन या प्राचीन कलांचा वारसा लोकांपर्यंत नेण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन युवा चित्रकथी कलाकार बाळकृष्ण मसगे यांनी येथे केले.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या व्यासपीठाच्या सतराव्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते. ओरोस येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात श्री. मसगे यांनी दोन तासांहून अधिक काळ रसिकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर उपस्थित होते. अत्यंत प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्लाखान राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. मुंबरकर यांच्याहस्ते श्री. मसगे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नी मीरा मसगे यांचा सत्कार ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्याहस्ते करण्यात आला.
सुरुवातीला ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष व ‘आम्ही साहित्यप्रेमी’ उपक्रमाचे समन्वयक सतीश लळीत यांनी श्री. बाळकृष्ण मसगे यांचा परिचय करुन देतानाच ठाकर समाजाच्या चित्रकथी, लेदर पपेटस्, कळसुत्री बाहुल्या, पांगुळबैल, सांकेतिक भाषा आदी कलांबाबत माहिती दिली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्राचीन वारसा असलेल्या या कला पुढेही टिकून रहाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री. मसगे यांनी या लोककलांची साद्यंत माहिती, बाहुल्या बनविण्याच्या पद्धती, आधुनिक तंत्राचा वापर करुन त्यात केलेल्या सुधारणा, विविध वाद्ये, परंपरा, आपला आजपर्यंतचा प्रवास याची माहिती ओघवत्या भाषेत देऊन सादरीकरणही केले. श्रोत्यांच्या प्रश्नांनाही समर्पक उत्तरे दिली.
श्री. मसगे म्हणाले की, प्रतिष्ठेचा असा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यावर एकदिड महिना होत आला आहे. मात्र ही दखल पहिल्यांदा ‘घुंगुरकाठी’ने घेतली आणि माझा पहिला सत्कार केला. लोककला आणि कलावंतांकडे पहाण्याची समाजाची मानसिकता यातून स्पष्ट होते. एकीकडे शासनाकडुन पुरस्कार मिळत आहेत. माझे वडील श्री. गणपत मसगे यांनाही २००५ साली तत्कालिन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याहस्ते राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. मात्र असे असले तरी आज ठाकर लोककलांची स्थिती फारशी चांगली नाही. आज माझ्यासमोर अनेक कल्पना आहेत. पण त्या राबविण्यासाठी कलाकार मिळत नाहीत. कमी उत्पन्नामुळे युवा पिढीची मानसिकता नोकरी, कामधंदा करण्याकडे आहे. यामुळे नवीन कलाकार घडवणे हे मोठे आव्हान आहे. कलाकार मोठ्या प्रमाणात कमी पडत आहेत. ही कमी भरुन काढण्यासाठी ही कला केवळ ठाकर समाजाची आहे, असे न मानता सर्वच समाजातील युवकांनी पुढे येऊन या लोककलांचे सादरीकरण शिकणे काळाची गरज बनली आहे. अशा युवकांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असला तरी जिल्ह्याचे पर्यटन समुद्र किनारे आणि मत्स्याहार एवढ्यावरच मर्यादित राहिले आहे, असे सांगून श्री. मसगे म्हणाले की, सांस्कृतिक पर्यटन हाही एक महत्वाचा प्रकार आहे. त्या त्या ठिकाणचा वारसा, लोककला पाहण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. मात्र यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शासनामार्फत या कलांना व्यासपीठ मिळाले आणि त्या पर्यटकांपर्यंत पोचल्या तरच या लोककला टिकून राहतील आणि जे काही अगदी कमी कलाकार अजूनही तग धरुन आहेत, तेही टिकून राहतील. नवीन कलाकार तयार होत नसल्याने आधीच अस्तंगत होण्याच्या टप्प्यावर आलेल्या या कलांकडे शासनानेही यादृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे.
मुंबई येथील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून बी.एफ.ए. (बॅचलर ऑफ फाईन आर्टस्) ही पदवी संपादन केलेले श्री. मसगे त्यांचे कुटुंबिय आणि बी.टेक. झालेली पत्नी सौ. मीरा हिच्यासह या कलांचा गाडा पुढे नेण्याचे आटोकाट प्रयत्न करीत आहेत. आपले वडील श्री. गणपत सखाराम मसगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतभर या लोककलांचा प्रचार व प्रसार केला आहे. त्यांच्या पुढाकारातून पिंगुळी येथे 'ठाकरवाडी म्युझियम' या आगळ्यावेगळ्या आदिवासी पुरातन वस्तुसंग्रहालयाची निर्मिती केली आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी या कलाकारांचे कौतुक करुन या प्राचीन लोककला प्रतिकुल परिस्थितीत टिकविण्याचे आव्हान उत्तमपणे पेलत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. श्री. मनोहर सरमळकर यांनी आभार मानले.००००००००




