
हायटेन्शन वीजवाहिनीच्या बिघाडामुळे खेड तालुक्यातील ७० गावे १५ तास अंधारात; नागरिकांत संताप
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात महावितरणच्या वीजपुरवठ्याचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हायटेन्शन वीजवाहिनीत बिघाड झाल्याने भरणे–वेरळ–आंबवली परिसरातील सुमारे ७० गावांचा वीजपुरवठा तब्बल १५ तास खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
शनिवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. काही गावांमध्ये पूर्णपणे वीज गुल झाली, तर काही ठिकाणी कमी दाबाने वीजपुरवठा सुरू असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. कशेडी येथील हायटेन्शन वीजवाहिनीत बिघाड झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळाली.
महावितरणकडून आंबवळी परिसरातील काही गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र, वेरळ व भरणे परिसरातील सुमारे २० ते २५ गावे रविवारी दुपारपर्यंतही अंधारातच होती.
या भागात पावसाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सलग १० ते १५ तास वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेतीची कामे, दळणवळण तसेच दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले.
याबाबत माहिती घेण्यासाठी नागरिकांनी महावितरणच्या फोनवर फोन केले असता कर्तव्यावर असणारे तेथील यांत्रिक कर्मचारी मनीष कदम यांनी ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या उर्मट कर्णचऱ्यावर कार्यकारी अभियंता श्री. बाबरेकर यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बिघाड दुरुस्त करण्यात वारंवार होणारा विलंब आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, महावितरणने कायमस्वरूपी उपाययोजना करून अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.




