
पर्यटकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर बंदी वाढविण्याची तयारी
पर्यटकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गणपतीपुळे येथील समुद्रकिनार्यावर जाण्यास घालण्यात आलेली बंदी १ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवावी, असा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडे सादर केला आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत.
जुलै महिन्यात परजिल्ह्यातून आलेल्या एका पर्यटकाचा गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यात समुद्राला उधाण येत असल्याने पर्यटकांना किनार्यावर जाण्यास मज्जाव केला होता. किनार्यावर लांबलचक दोरी बांधून सूचना फलकही लावण्यात आले आहेत. सध्या समुदात अजूनही उधाण असल्याने पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन गणपतीपुळे किनार्यावर पर्यटकांना १ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश देऊ नये, असा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने तहसिल प्रशासनाकडे पाठविला आहे.




