कासार्डेत आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने दि. ५ सप्टेंबर रोजी रु.१,११,१११ ची भव्य दहीहंडी उत्सव..!

कासार्डे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची दहीहंडी समजल्या जाणाऱ्या कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने शनिवार दि.५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ ते रात्रौ ११ या वेळेत गोपाळकाल्यानिमित्त कासार्डे तिठा येथील महामार्गनजीक पटांगणामध्ये भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रम प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायणराव राणे, भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण , पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर सतीश मोरे आदी नेत्यांसह भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा आमदार प्रमोद जठार व दोन्ही जिल्हयातील विविध पक्षांचे मान्यवर नेते पदाधिकारी – कार्यकर्ते व गाव मानकऱ्यांच्या उपस्थितीत रु १,११,१११ रकमेच्या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळाचे हे नॉनस्टॉप १४ वे वर्ष असून यावेळी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांना सहभागी होता येईल.
आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षी मोठया धुमधडाक्यात मानाची दहीहंडी म्हणून ही हंडी साजरी होते . त्यामुळे याही वर्षी मोठ्या जल्लोषात साजरी होणार असून आपल्याकडील ग्रामीण भागातील गोविंदा पथकांना या दहीहंडी उत्सवात सहभागीं होता यावें त्यांना यातून आनंद,उत्साह, व आपले कौशल्य दाखविता यावे त्यातूनही अनेक नवीन गोविंदा पथके निर्माण होऊन त्यांना प्रोत्साहन व बक्षिसे मिळाविता यावीत या उद्देशाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी अशा दोन जिल्ह्यातील गोविंदा पथकांसाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आठ थरांचे मनोरे रचून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला रोख रु १ लाख ११ हजार १११ रुपये व आकर्षक कोकण दूध चषक देण्यात येणार आहे. चार थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना रोख ३ हजार ३३३ रुपये, पाच थरांची सलामी देणाऱ्यासाठी ४ हजार ४४४ रुपये, सहा थरांची सलामी देणाऱ्यासाठी ५ हजार ५५५ रुपये, सात थरांची सलामी देणाऱ्यासाठी ६ हजार ६६६ रुपये व प्रत्येकी आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. यावेळी डी. जे. व ढोलपथकांच्या गजरासह दुपारी २.३० वा. गावातील स्थानिक प्रतिष्ठीत मानकरी व पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या हस्ते दहीहंडीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ होणार आहे त्याचबरोबर सायं ४ वाजल्यानंतर खास रसिक प्रेक्षकांसाठी सध्या महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर गाजत असलेला कोल्हापूर येथील ३५ कलाकारांच्या संचातील रजनी गोरड प्रस्तुत ऑर्क्रेस्ट्रा धमाका म्युझिकल नाईट हा जुन्या नव्या मराठी-हिंदी रिमिक्स, दिलखेचक लावण्या, उत्कृष्ट गायक-निवेदक, अत्याधुनिक साउंड सिस्टीम – स्पेशल लेझर- शार्पी नेत्रदीपक लाईट इफेक्टस, सुमधुर संगीत, वन्समोअर नृत्यगीतांचा जबरदस्त हंगामा- व्हरायटी शो असलेला बहारदार कार्यक्रम होणार आहें. सदर कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ कुपन आकर्षक भेटवस्तू चे आयोजन करणेत आले आहे. तरी या भव्य दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हयातील गोविंदा पथकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे यासाठी इच्छुकांनी माहितीसाठी व नावनोंदणीसाठी प्रमोद जठार मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव मोबा ९४०३२८९००५ अथवा श्री रोहित महाडीक भाजप कार्यालय कासार्डे ७०६६९३१०५३ येथे संपर्क साधावा असे आवाहन आम. प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button