जायचे होते नागपूरला, पोहोचले हैदराबादला! उद्योगमंत्र्यांचा असाही विमान प्रवास; म्हणाले, “मी खरा शिवसैनिक असल्यामुळेच…”


मुसळधार पावसामुळे विमानाला नागपूर विमानतळावर उतरता आले नाही. त्यानंतर मुंबई, नाशिक आणि अखेर हैदराबाद असा प्रवास करीत राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी पहाटे दोन वाजता चंद्रपूर गाठले.

या प्रवासाचा किस्सा त्यांनी चंद्रपूर येथे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त सांगितला. ‘मी खरा शिवसैनिक असल्यामुळेच या सर्व परिस्थितीवर मात करून चंद्रपुरात दाखल झालो,’ असे सामंत यांनी यावेळी सांगितले.

नेमकं काय घडलं?

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत मंगळवारी रात्री मुंबईहून विमानाने नागपूरकडे रवाना झाले होते. मात्र, नागपूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमान नागपूर विमानतळावर उतरविणे शक्य नसल्याचे वैमानिकाने त्यांना सांगितले. त्यामुळे विमान पुन्हा मुंबईकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबईतही पावसाची स्थिती गंभीर असल्याने विमान नाशिककडे वळविण्यात आले. नाशिकमध्येही पावसाचा जोर कायम असल्याने तेथेही विमान उतरविणे शक्य झाले नाही. अखेर विमान हैदराबादकडे वळविण्यात आले.

हैदराबाद विमानतळावर दोन तास प्रतीक्षा

हैदराबाद विमानतळावर सुमारे दोन तास प्रतीक्षा केल्यानंतर डॉ. सामंत पुढील प्रवासासाठी रवाना झाले. त्यानंतर रात्री उशिरा ते नागपुरात पोहोचले आणि तेथून रस्तेमार्गे चंद्रपूरकडे रवाना झाले. पहाटे सुमारे दोन वाजता त्यांचे चंद्रपुरात आगमन झाले..या प्रवासातील अडचणींचा उल्लेख करताना सामंत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दौरा रद्द करण्याऐवजी कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूर गाठण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले.

पावसामुळे अडथळे आले, पण चंद्रपूर गाठलेच

पावसामुळे विमान प्रवासात वारंवार अडथळे आले, तरीही चंद्रपूरचा दौरा पूर्ण करण्याला त्यांनी प्राधान्य दिले. दरम्यान, उद्योगमंत्र्यांच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील औद्योगिक प्रश्न, संघटनात्मक बाबी तसेच आगामी काळातील कामकाजाबाबत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा झाली. प्रतिकूल हवामानातही पहाटे चंद्रपूर गाठल्याने त्यांच्या प्रवासाची चर्चा सर्वत्र सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button