
खेड तालुक्यातील विकासकामांसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट
खेड : तालुक्यातील विविध प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांच्या संदर्भात मुंबई येथील मंत्रालयात महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ आण्णा कदम, तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे आणि पंचायत समिती सभापती डॉ. आफीया पालेकर यांनी खेड तालुक्यातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.
तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासह प्रस्तावित विकासकामांना गती देण्यासाठी यावेळी पाठपुरावा करण्यात आला. खेड तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
या भेटीप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक सुनील दरेकर, प्रथमेश दरेकर, किशोर साळवी यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.




