खड्ड्यांवरून चिपळूण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक; राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना ‘बेशरमची झाडे’ भेट

चिपळूण : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांच्या कथित निष्क्रियतेचा निषेध नोंदवित उपअभियंता व उपविभागीय अधिकारी यांना ‘बेशरमची झाडे’ भेट देत आंदोलन करण्यात आले.

शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, युवा सेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पागे ते बहादूरशेख नाका या दरम्यान महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्याचा आरोप केला. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी पार्थ जागुष्टे म्हणाले, “खड्डे बुजविण्याऐवजी प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी ‘बेशरमची झाडे’ भेट देण्यात आली आहेत. चिपळूणची प्रतिमा या खड्ड्यांमुळे मलिन होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.”

आठ दिवसांच्या आत महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत, तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेने यावेळी दिला.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.

या आंदोलनात चिपळूण तालुका युवती अधिकारी तीर्था लाड, उपशहर प्रमुख मनोज पांचाळ, विभाग प्रमुख बंधू कदम, विकास गांगण, युवा सेनेचे आकाश कदम, ओंकार गायकवाड, राहुल गुरव, झियाद चिकटे, रोहन पवार, शाकीर आरकटे तसेच शिवसेना व युवा सेनेचे अन्य पदाधिकारी सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button