
अर्जुना धरण शंभर टक्के भरले; सांडव्यावरून 2.41 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
राजापूर : तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्प सोमवारी (दि. २८ जुलै) सकाळी ७ वाजता शंभर टक्के भरला असून, धरणाच्या सांडव्यावरून २.४१ क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदीपात्र, नाले तसेच धरण परिसरात प्रवेश न करण्याचे आवाहन केले आहे.
धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण व अनुषंगिक परिसरात प्रवेशास बंदी घालण्यात आली असून, परिसरात सीसीटीव्ही यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन धरण, नदीपात्र आणि नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जुना मध्यम प्रकल्पाची आजची स्थिती :
पाणीपातळी : १७७.०५ मीटर
उपयुक्त पाणीसाठा : ७२.५६ दशलक्ष घनमीटर
धरण साठा : १०० टक्के
आजचा पाऊस : ७४ मिमी
१ जून २०२६ पासून एकूण पर्जन्यमान : २००१ मिमी
सांडवा विसर्ग : २.४१ क्युमेक्स
विमोचक विसर्ग : ०.०० क्युमेक्स
प्रशासनाने सर्व नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि कोणतीही जोखीम न पत्करता सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.




