दापोली-खेड मार्गावर दुचाकी घसरली; तरुणीचा मृत्यू, मैत्रीण जखमी


दापोली-खेड मार्गावरील वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात एका २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिच्यासोबत प्रवास करणारी दुसरी तरुणी किरकोळ जखमी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सेजल पांडुरंग भागवत (वय २२, मूळ रा. टेटवली-खुटाचा कोंड, सध्या रा. विद्यापीठ चाळ, दापोली) आणि वैष्णवी चंद्रकांत आयरे (मूळ रा. असोंड, ता. दापोली, सध्या रा. विद्यापीठ चाळ, दापोली) या दोघी दुचाकीवरून दापोलीकडे येत होत्या. वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन घसरले आणि दोघीही रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळल्या.

घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता दोन्ही जखमींना स्वतःच्या वाहनातून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने तसेच नाक-तोंडात पाणी गेल्यामुळे सेजल भागवत हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या अपघातात वैष्णवी आयरे हिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button