रत्नागिरीत सुरु होणार हस्तकला केंद्र पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतली बैठक


रत्नागिरी, दि. 27 ):- जिल्ह्यात पर्यटन वाढून जिल्ह्याचे उत्पन्नात अधिक वाढ व्हावी या हेतूने महाराष्ट्र राज्य लघू उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योग मंडळाने रत्नागिरीत हस्तकला केंद्र सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी एमआयडीसीच्यामार्फत जागा आणि महाराष्ट्र राज्य लघू उद्योग विकास महामंडळाकडून निधी दिला जाईल, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात याबाबत आज बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, एमआयडीसीच्या क्षेत्रीय अधिकारी वंदना खरमाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर, खादी ग्रामोद्योगचे उप कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कनसे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, हस्तकला केंद्र हे पर्यटन स्थळ व्हावे त्याचबरोबर अधिकाधिक स्थानिक महिलांना यामधून रोजगार निर्माण होईल. त्यादृष्टीने खादी ग्रामोद्योगने हा प्रकल्प महाराष्ट्राला दाखवून द्यावे.
सीएमईजीपीचे उद्दिष्ट महिन्यात पूर्ण करा
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सर्व बँकर्सची बैठक घेवून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा आढावा घेतला. बँकनिहाय उद्दिष्ट आणि त्यांनी केलेली पूर्तता याबाबत माहिती घेतली. ते म्हणाले, सर्व बँकांनी आपली कामगिरी चांगल्या पध्दतीने दाखवावी. दिलेले उद्दिष्ट दोन महिन्यात पूर्ण करावे. ज्या बँकेची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहील त्यांचा सत्कार केला जाईल. त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्यामार्फत प्रकरणांचा पाठपुरावा करुन उद्दिष्ट पूर्ण करावे. उद्दिष्ट न गाठणाऱ्या वा सुमार कामगिरी करणाऱ्या बँकांसाठी वेगळा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कनसे यांच्यासह बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
यानंतर रत्नागिरी नगरपरिषदेमार्फत सुरु असणाऱ्या आणि करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. या बैठकीला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button