
रसायनांना पर्यायी ठरला कडुलिंब; वन्यजीवांना लाभले; आरोग्य कवच, परजीवींचा धोका सत्तर टक्क्यांनी घटला..
पुणे : कडुनिंबाच्या बियांच्या गराच्या ५ टक्के अर्काची फवारणी केल्यास बंदिस्त वन्यप्राण्यांच्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या बाह्य परजीवींवर ६९.३३ टक्के प्रभावी नियंत्रण मिळत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत त्यांचा संसर्ग मानवांमध्येही संक्रमित होण्याची शक्यता असते. ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये या संदर्भातील संशोधन पेपर प्रसिद्ध झाला. सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांनी पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात संशोधन केले.
मुख्य संशोधक विद्यार्थी सत्यमूर्ती केंद्रे यांनी काळवीट, हत्ती ,बिबट्या, अस्वल, वाघ आणि हरीण या सहा वन्यजीवांच्या परजीवींचा अभ्यास केला. संशोधनामध्ये प्राण्यांच्या निवारास्थळी आणि रात्रीच्या निवासस्थानी कीटक सापळे बसविणे, कंगवा आणि प्रत्यक्ष निरीक्षणांनी उपचारांपूर्वी आणि उपचारानंतर बाह्य परजीवींची संख्या नोंदविण्यात आली. १९ दिवसांच्या अभ्यासात एकूण ८६५ बाह्य परजीवी आढळले. उपचारांपूर्वीच्या नऊ दिवसांत ६६२ परजीवी नोंदविण्यात आले.
यानंतर दहाव्या दिवशी प्राण्यांच्या निवाऱ्यांची स्वच्छता करून ५ टक्के कडुनिंब बियांच्या गराच्या अर्काची फवारणी करण्यात आली. पुढील नऊ दिवसांत परजीवींची संख्या २०३ पर्यंत नोंदवण्यात आली. बंदिस्त वन्यप्राण्यांना माशा, उवा आणि पिसवा यांसारख्या बाह्य परजीवींचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. या परजीवींवर नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जात असला, तरी त्यांचे अवशेष, पर्यावरणीय प्रदूषण, विषारी परिणाम आणि कीटकांमध्ये वाढणारी प्रतिकारशक्ती या कारणांमुळे पर्यावरणपूरक पर्यायांचा शोध सुरू आहे.
कडुनिंबाच्या अर्कामुळे माश्यांचे प्रमाण ६९.२९ टक्क्यांनी, उवांचे प्रमाण ६६.६७ टक्क्यांनी कमी झाले. पिसवांवर जवळपास शंभर टक्के नियंत्रण मिळवल्याचे संशोधनातून समोर आले. अभ्यासातील सहा प्राण्यांच्या प्रजातींपैकी हत्तींमध्ये कडुनिंबाच्या अर्काची सर्वाधिक ८१.७६ टक्के परिणामकारकता आढळली. संशोधकांच्या मते, हत्ती स्वतंत्रपणे वावरत असल्याने परजीवींचा प्रसार मर्यादित राहतो. याउलट, हरिण कळपाने राहत असल्याने एका प्राण्यावरून दुसऱ्यावर परजीवी सहज पसरतात, त्यामुळे त्यांच्यात परिणामकारकता तुलनेने कमी दिसून आली. तसेच, काळवीटांमध्ये बाह्य परजीवींचे प्रमाण सर्वांत कमी नोंदवण्यात आले.
कडुनिंबावर आधारित कीटकनाशकांवर यापूर्वी पाळीव प्राण्यांवर संशोधन झाले असले, तरी बंदिस्त वन्यप्राण्यांवर त्याच्या परिणामकारकतेबाबत वैज्ञानिक माहिती मर्यादित होती. सुरुवातीला मुक्त संचार करणाऱ्या वन्यप्राण्यांवर संशोधन करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने नियंत्रित परिस्थितीत बंदिस्त प्राण्यांवर प्रायोगिक अभ्यास करण्याचा सल्ला दिल्यानंतर कात्रज प्राणीसंग्रहालयात हा अभ्यास करण्यात आल्याचे संशोधक केंद्रे यांनी सांगितले.
वन्यप्राण्यांच्या रोगप्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आणखी संशोधनाची गरज आहे. वन्यजीवांना उत्तम प्रतीच्या सेवा देता याव्यात यासाठी संग्रहालयाच्या वतीने विविध शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन दिले जाते. – डॉ. राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणी संग्रहालय
आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने या संशोधनाची दखल घेतली ही मोठी बाब आहे. मात्र, ज्यांना संशोधन करायचे आहे, त्यांनी एक प्रजाती घेऊन त्यावर दीर्घकालीन संशोधन करावे. त्याचे अनेक तपशील तपासून त्यावर विविध पैलू आणि अंगांचा विचार करून संशोधन करावे. डॉ. सत्यमूर्ती बालाजी केंद्रे, संशोधक, पशुवैद्यकीय विज्ञान पदव्युत्तर पदवी पशुवैद्यकीय परजीवी शास्त्
तीन वर्षांपूर्वी मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे वन्यजीवांच्या आरोग्यावर परजीवींमुळे गंभीर परिणाम झाले होते. त्यातूनच यावर संशोधन व्हायला हवे, असे वाटले. कुठल्याही रासायनिक फवारणीचा वापर न करता आयुर्वेदिक उपचारपद्धती अवलंबता येईल का, याविषयी शोध सुरू झाला. याची चांगली परिणामकारकता दिसली. सकारात्मक बाब म्हणजे राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दर १५ दिवसांनी ही फवारणी केली जात आहे. डॉ. प्रशांत पवार, विभागप्रमुख, परजीवी शास्त्र, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय
संशोधनात काय?
- सहा वन्यप्राण्यांच्या प्रजातींवर संशोधन
- उपचारांपूर्वी ६६२ आणि उपचारांनंतर २०३ परजीवींची नोंद
- एकूण परजीवींमध्ये माश्यांचे प्रमाण ९३.९९ टक्के, उवा ५.५५ टक्के आणि पिसवा ०.४६ टक्के होते. कडुनिंबाच्या लिंबोरी बियांच्या अर्काच्या फवारणीनंतर एकूण बाह्य परजीवी ६९.३३ टक्के कमी झाले. पिसव्यांवर शंभर टक्के, माश्यांवर ६९.२९ टक्के आणि उवांवर ६६.६७ टक्के परिणामकारकता दिसली.
- सर्वाधिक परिणाम हत्तींच्या निवाऱ्यात (८१.७६ टक्के )



