
महामार्गावरील मोकाट जनावरांमुळे वाढता धोका; युवासेनेकडून प्रशासनाला निवेदन
रत्नागिरी तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावर मोकाट जनावरांचा वाढता वावर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याची बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात महामार्गावर मोकाट फिरणाऱ्या गायी व म्हशींमुळे विशेषतः रात्री आणि पहाटे अपघातांचा धोका वाढत असून नागरिकांच्या जीवितासह वाहनांचेही मोठे नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
युवासेनेने प्रशासनाकडे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना याबाबत लेखी सूचना देण्याची मागणी केली आहे. गुरे महामार्गावर मोकाट सोडू नयेत, त्यांच्यासाठी सुरक्षित गोठे किंवा बंदिस्त व्यवस्था करावी तसेच मोकाट जनावरे आढळल्यास संबंधितांवर ग्रामपंचायत स्तरावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, या समस्येची गंभीर दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच ग्रामसेवकांना यासंदर्भात सक्त सूचना देण्यासाठी पत्र पाठविण्यात येईल, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी दिल्याची माहिती प्रसाद सावंत यांनी दिली.




