रत्नागिरी-मुंबई सी-प्लेन सेवेला वेग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून आवश्यक त्या प्रक्रियेल सुरूवात


रत्नागिरी ते मुंबई दरम्यान सी-प्लेन सेवा सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे. सेवा प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून प्रशासकीय, तांत्रिक आणि आर्थिक स्तरावरील आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विविध टप्प्यांतील मंजुरीनंतरच सी-प्लेन सेवा वास्तवात येणार आहे. या प्रकल्पाचा पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या आगामी बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळवणे. बोर्डाच्या संचालक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.
रत्नागिरी-मुंबई सी-प्लेन सेवेला वेग उतरविणे आणि उड्डाणासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. समुद्रातील पाण्याचा प्रवाह, भरती-ओहोटी, वार्‍याचा वेग, तसेच लैंडिंग आणि टेक-ऑफसाठी सुरक्षित जागेची निवड यासारख्या बाबींची तज्ज्ञांकडून तपासणी करून सविस्तर तांत्रिक अहवाल तयार करण्यात येणार आहे.
प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी मेरीटाईम बोर्डाकडून विशेष सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. प्रवाशांचा संभाव्य प्रतिसाद, पर्यटकांची संख्या, तिकीट दर, सेवा चालविण्याचा खर्च आणि आर्थिक शाश्वतता यांचा अभ्यास करून सल्लागार आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे तिकीट दर, उड्डाणांचे वेळापत्रक आणि सेवा संचालनाचा आराखडा निश्चित केला जाईल.
मेरीटाईम बोर्डाच्या नियोजन विभागाचे अधिकारी प्रदीप बढये यांनी या प्रकल्पाच्या तयारीला वेग आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे घोषणा झाल्यानंतर आता प्रत्यक्षात तांत्रिक चाचण्या व्यवहार्यता अहवाल, आवश्यक परवानग्या आणि प्रशासकीय मंजुरी या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रत्नागिरीच्या समुद्रावरून सी-प्लेनची सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button