पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची- प्रा. डी. आर. वालावलकर

अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वसुंधरा जिज्ञासा मंडळाचे उद्घाटन

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच वसुंधरा जिज्ञासा मंडळाच्या विविध क्षेत्रभेटीत उस्फूर्त सहभागी होऊन अधिकाधिक ज्ञान संपादन करावे. पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असून त्याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी असे आवाहन ज्येष्ठ प्रा. डी. आर. वालावलकर यांनी केले. अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वसुंधरा जिज्ञासा मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, व्याख्याते गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे सचिन सनगरे आणि कला विभाग प्रमुख वैभव कानिटकर उपस्थित होते. सुरवातीला प्रा. गोसावी यांनी पृथ्वीगोलास पुष्पहार अर्पण केला.
वसुंधरा जिज्ञासा मंडळाचे समन्वयक प्रा. दत्तात्रय माळवदे यांनी येत्या वर्षभरात मंडळामार्फत भूगोल विषयावरील हस्तलिखित, मॅप कॉम्पिटिशन, क्षेत्रभेटी ,सहल परिसंवाद व विविध व्याख्यानांचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले. उपप्राचार्य प्रा. गोसावी यांनी भूगोल अभ्यासाची गरज आणि भूगोलातील करिअरच्या संधी याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रा. वैभव कानिटकर यांनी स्पर्धा परीक्षेतील भूगोल विषयाचे महत्त्व सांगितले.

प्रा. सचिन सनगरे यांनी लोकसंख्या वाढ व तिचे दुष्परिणाम, उपलब्ध संसाधनावर येणारा ताण कसा कमी करता येईल, तसेच शाश्वत विकासाविषयी अनेक उदाहरणे देऊन आपले बहुमोल विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत, विविध प्रश्न विचारून प्रस्तुत विषयाबाबतीतील जिज्ञासा व्यक्त केली.

कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी शिक्षक आदेश मुकणे आणि सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन शिक्षक नितीन पेटावे यांनी केले. दत्तात्रय सरगर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button