
पश्चिम महाराष्ट्र-कोकण प्रवासाला नवी गती; जयगड–चिपळूण–सातारा द्रुतगती महामार्गाच्या नियोजनाला प्रारंभ
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जयगड–चिपळूण–सातारा द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या प्रस्तावित प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करणे आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
प्रस्तावित सुमारे ९८ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदराला चिपळूणमार्गे सातारा आणि पुढे मुंबई–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार आहे. या मार्गामुळे सध्या सुमारे पाच तास लागणारा सातारा–जयगड प्रवास भविष्यात जवळपास एका तासात पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महामार्गाच्या आराखड्यात सुरुवातीला चार पदरी रस्ता, तर भविष्यात आठ पदरी विस्ताराची तरतूद करण्यात येणार आहे. नागरी भागात सेवा रस्ते, आवश्यक तेथे नवीन पूल, विद्यमान पुलांचे रुंदीकरण तसेच डोंगराळ भूप्रदेशामुळे बोगद्यांचाही समावेश केला जाणार आहे.
प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन, संभाव्य पुनर्वसन, पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम, सार्वजनिक सुविधांचे स्थलांतर, झाडांची तोड, तसेच एकूण आर्थिक खर्चाचा सविस्तर अभ्यास सल्लागार संस्थेमार्फत केला जाणार आहे.
या महामार्गासाठी सुमारे ९,६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, जयगड बंदराच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. खोल पाण्याचे आणि बारमाही कार्यरत असलेले जयगड बंदर लोहखनिज, कोळसा, बॉक्साईट, चुनखडी यांसारख्या मालवाहतुकीसाठी महत्त्वाचे असून, देशातील एलएनजी आणि एलपीजी साठवणुकीच्या दृष्टीनेही त्याचे विशेष स्थान आहे.
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, पर्यटन तसेच मालवाहतुकीला मोठा वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




