
मनोज जरांगे यांनी मुंबईला येऊ नये’; गणेशभक्तांची गैरसोय टाळावी : उदय सामंत
सरकारने जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्याचा उद्योगमंत्र्यांचा दावा; गणेशोत्सवात शांतता-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
चिपळूण : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईला येऊ नये, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असून, हिंदूंच्या सणात अडथळा निर्माण होणार नाही, अशी भूमिका सर्वांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे-पाटील यांना त्यांच्या मागण्यांबाबत अनेकदा सर्वांनी समजावून सांगितले आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्याचा दावा सामंत यांनी केला. त्यामुळे त्यांनी मुंबईत येऊन आंदोलन करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
“गणेशोत्सव महाराष्ट्रासह देशात आणि जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात गणेशभक्तांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे,” असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक प्रवास करतात. त्यामुळे आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था किंवा गणेशभक्तांच्या प्रवासात अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. गणेशभक्तांची गैरसोय होणार नाही, याची जबाबदारी संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही सामंत यांनी केले.
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, हिंदूंच्या सणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, अशी भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी घ्यावी, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.




