
महावितरणचा वीजचोरांवर एआय वॉच; तीन महिन्यांत ६६ कोटींच्या वीजचोऱ्या उघड!
नाशिक : वीज चोरी विरोधातील कारवाईला महावितरणने आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड दिली आहे. वीजवापरातील संशयास्पद बदलांचा अभ्यास करून वीजचोरीची संभाव्य ठिकाणे शोधणाऱ्या एआय मॉड्यूलच्या मदतीने गेल्या तीन महिन्यांत राज्यात २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी २४ हजार ५०८ प्रकरणांत ६६ कोटी २८ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे स्पष्ट झाले. नाशिकसह राज्यातील वीजग्राहकांच्या जोडण्यांवर आता तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष ठेवले जात आहे.
वीजग्राहकांचा जुना आलेख, मागणीतील अचानक घट किंवा वाढ, मीटरमधील तांत्रिक फेरफार आणि ५० हून अधिक निकषांचे एआय मॉड्यूल २४ तास विश्लेषण करते. परिसरातील व मिटरमधून उपलब्ध होणाऱ्या वीजवापराच्या माहितीचा उपयोग करून संशयास्पद जोडण्या शोधण्याची प्रक्रिया अधिक अचूक होण्यास मदत होऊ शकते. संशयास्पद फरक वीजचोरीची ठिकाणे शोधण्यापासून ते कारवाईपर्यंतची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. ‘थेफ्ट ट्रॅकिंग अँण्ड मॉनिटरिंग सिस्टीम’द्वारे तपासणी, डिजिटल पंचनामा, प्रत्यक्ष ठिकाणी वीजपुरवठा खंडित करणे आणि दंडात्मक बिलांची वसुली यांची माहिती नोंदवली जाते. यासाठी स्वतंत्र मोबाइल अँप विकसित करण्यात आले आहे. राज्यभरातील १९० हून अधिक भरारी पथकांकडून कारवाई सुरू आहे.
२९ कोटींचा भरणा, २८९ प्रकरणांत गुन्हे
जून ते ऑगस्ट या कालावधीत छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात ५ हजार ८३, कोकणमध्ये ११ हजार ८३, नागपूरमध्ये ५ हजार ९४९ आणि पुणे प्रादेशिक विभागात ५ हजार ८४९ वीजचोऱ्या उघड झाल्या. वीजचोरीच्या बिलांपोटी आतापर्यंत १० हजार ८१० प्रकरणांत २९ कोटी ८५ लाख रुपयांचा भरणा झाला आहे. वीजचोरीची रक्कम आणि तडजोड शुल्क मुदतीत न भरल्यास फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत २८९ प्रकरणांत कलम १३५ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत.
१९० हून अधिक भरारी पथके
वीजचोरीविरोधी पारंपरिक तपासणीसोबतच महावितरणने आता हायटेक मोहीम उघडली आहे. यासाठी थेट ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ व ‘मशीन लर्निंग’चा वापर करून वीजचोरीचे अचूक भाकित करणारे मोड्यूल तयार केले आहे. ज्या ग्राहकांच्या वीजवापरामध्ये शंकास्पद फरक आढळत आहे त्या ग्राहकांना हे ‘एआय’चे मोड्यूल ‘हाय-रिस्क’ श्रेणीत टाकत आहे. त्यामुळे कोणत्याही तपासणीशिवाय थेट चोरी होणाऱ्या ठिकाणाची अचूक माहिती या मोड्यूलद्वारे उपलब्ध होत आहे. ‘एआय’च्या ‘सुपर इंटेलिजन्स’चा वापर करून वीजचोरीच्या ठिकाणांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे राज्यभरात १९० हून अधिक विशेष भरारी पथके कार्यरत आहेत.
वीजचोरीला आळा घालण्याचे उद्दिष्ट
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी येत्या तीन वर्षांत तांत्रिक व वाणिज्यिक हानी १० टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. वीजचोरीविरोधातील कारवाई अधिक अचूक करण्यासाठी एआय मॉड्यूलचा वापर वाढविण्यात येत आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.



