
शिमगोत्सवाच्या पालख्यांची प्रेरणा घेऊन प्रसाद देवस्थळींची 72 किमीची खार्दुंगला झेप!
उणे 1 अंश तापमान, 32.5 किमीचा खडतर चढ अन् 14 तासांचे आव्हान; रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले धावपटू म्हणून कामगिरी
रत्नागिरी : अत्यंत प्रतिकूल हवामान, शून्याच्या आसपासचे तापमान, तब्बल 32.5 किलोमीटरचा खडतर चढ आणि त्यानंतरचा आव्हानात्मक डोंगराळ मार्ग… अशा कठीण परिस्थितीवर मात करत कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे आयोजक प्रसाद देवस्थळी यांनी 72 किलोमीटरचे खार्दुंगला चॅलेंज यशस्वीपणे पूर्ण केले. ही कामगिरी करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले धावपटू म्हणून त्यांचे कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे, ही अवघड धाव पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली ती आपल्या कोकणातील शिमगोत्सवाच्या पालखी परंपरेतून! धामापूर गावातील आई नवसरी देवी आणि वाघजाई देवीच्या पालख्या शिमगोत्सवात मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थ खांद्यावर घेऊन वाडी-वाडीत तसेच घराघरांत नेतात. अनेक दिवस चालत ही परंपरा जपणाऱ्या ग्रामस्थांची जिद्द देवस्थळी यांच्या खार्दुंगला रनमध्ये सतत त्यांच्या डोळ्यांसमोर होती.
“प्रत्येक किलोमीटरला आपल्या धामापूर गावातील आई नवसरी देवी आणि वाघजाई देवीच्या पालख्या एका वाडीतून दुसऱ्या वाडीत जात आहेत, त्यांच्यासोबत मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थ चालत आहेत, हे सतत डोळ्यासमोर येत होते. त्यांच्या जिद्दीचा आणि परंपरेप्रती असलेल्या निष्ठेचा विचार मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत होता,” अशी भावना प्रसाद देवस्थळी यांनी व्यक्त केली.
32.5 किलोमीटरचा चढ ठरला कसोटीचा
खार्दुंग गावातून लेहपर्यंतचे 72 किलोमीटर अंतर 14 तासांच्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान धावपटूंसमोर होते. सुमारे उणे 1 अंश सेल्सिअस तापमानात रनला सुरुवात झाली. सुरुवातीचे तब्बल 32.5 किलोमीटर खार्दुंगला टॉपच्या दिशेने जाणारा चढ असल्याने हा टप्पा अत्यंत कठीण होता.
खार्दुंगला टॉपकडे जाताना बहुतांश धावपटूंना धावण्याऐवजी चालत पुढे जावे लागले. टॉपनंतर बदलते हवामान, तापमानातील चढ-उतार आणि खडतर डोंगराळ रस्त्यांमुळे पुढील प्रवासही तितकाच आव्हानात्मक राहिला.
या स्पर्धेसाठी विविध कठीण निकषांद्वारे पात्र ठरलेले सुमारे 325 धावपटू सहभागी झाले होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकांना हे आव्हान पूर्ण करता आले नाही.
“शारीरिक क्षमतेपेक्षा इच्छाशक्तीची परीक्षा”
या अनुभवाविषयी बोलताना देवस्थळी म्हणाले, “या रनमध्ये शारीरिक क्षमतेपेक्षा इच्छाशक्ती, जिद्द, काटकपणा आणि आत्मविश्वास यांची खरी परीक्षा होती. प्रत्येक पावलावर मन सांगत होतं की आता थांबावं; पण पुढचं पाऊल टाकत राहणं हाच पर्याय होता.”
“खार्दुंगला येथे येऊन रन करायची असेल तर केवळ प्रॅक्टिस पुरेशी नाही. उंची आणि वातावरणाशी शरीराला जुळवून घेण्यासाठी acclimatisation आणि शेवटपर्यंत give up न करण्याची मानसिकता अत्यंत महत्त्वाची आहे,” असेही त्यांनी सांगितले.
कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या प्रचारासाठी लडाखमध्ये
प्रसाद देवस्थळी 28 ऑगस्ट रोजी संपूर्ण टीमसह लेह येथे पोहोचले होते. कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनच्या प्रचारासाठी त्यांनी लडाख दौरा केला. त्याआधी सूरत, बडोदा, गांधीनगर, इंदूर, जयपूर, आग्रा, गाझियाबाद आदी रत्नागिरीशी रेल्वेने जोडलेल्या शहरांमध्येही मॅरेथॉनचा प्रचार करण्यात आला.
लडाखमध्ये खार्दुंगला चॅलेंजचे आयोजक पद्मश्री चेवांग मोटुप गोबा यांच्याशी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या टीमने संवाद साधला. त्यांना रत्नागिरीत होणाऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनसाठी आमंत्रित करण्यात आले.
“कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनविषयी मी खूप ऐकून आहे,” असे मोटुप यांनी सांगितल्याचे देवस्थळी यांनी नमूद केले.
“आयोजकांनी स्वतःही आव्हाने अनुभवली पाहिजेत”
“केवळ स्पर्धांचे आयोजन न करता स्वतःही अशा कठीण स्पर्धांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. त्यामुळे धावपटूंना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत, हे प्रत्यक्ष अनुभवता येते. त्यातून भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने स्पर्धांचे आयोजन करता येते,” असे देवस्थळी यांनी स्पष्ट केले.
या यशामध्ये मार्गदर्शन करणारे कोच दादा सत्रे यांचे त्यांनी विशेष आभार मानले. तसेच कुटुंबीय, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन फॅमिली आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब फॅमिली यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
“ही केवळ माझी कामगिरी नाही…”
“संपूर्ण कोकणवासीयांच्या शुभेच्छा, कुटुंबीयांचे प्रेम आणि KCM व RCC परिवाराचा पाठिंबा माझ्यासोबत होता. त्यामुळे ही केवळ माझी कामगिरी नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि प्रत्येक पावलावर शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाची ही कामगिरी आहे,” असे देवस्थळी म्हणाले.
72 किमीची धाव शिमगोत्सवाच्या परंपरेला समर्पित
आपल्या या यशाचे खरे श्रेय कोणाला द्याल, असे विचारल्यावर देवस्थळी यांनी पुन्हा धामापूरच्या पालखी परंपरेचा उल्लेख केला.
“शिमगोत्सवाच्या काळात आपल्या प्रथा-परंपरा जपण्यासाठी मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थ दहा-दहा, बारा-बारा दिवस पालखी घेऊन चालत राहतात. आपल्या धामापूर गावातील आई नवसरी देवी आणि वाघजाई देवीच्या पालख्या वाडी-वाडीतून फिरत असतात. त्या पालख्यांबरोबर चालणारे मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थ प्रत्येक क्षणी माझ्या डोळ्यासमोर होते. त्यांच्या जिद्दीचा विचार करत 72 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली.”
त्यामुळे खार्दुंगला चॅलेंजमधील ही संपूर्ण 72 किलोमीटरची धाव आणि मिळवलेले मेडल कोकणच्या शिमगोत्सवाच्या पारंपरिक पद्धती जपणाऱ्या सर्व मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थांना मनापासून समर्पित आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया प्रसाद देवस्थळी यांनी व्यक्त केली




