शिवाजीपथावरील बाजारबंदी कायम; आठवडा बाजारासाठी नदीलगत तात्पुरती जागा.. अवजड वाहनांना ‘नो पार्किंग’; नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण निर्णय


राजापूर : शहरातील गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात शिस्त राखणे, वाहतूक कोंडी टाळणे आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने राजापूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शिवाजीपथावरील गणेशघाट ते वैश्यंपायन गुरुजी पूल या मार्गावर आठवडा बाजार भरण्यास पूर्वीप्रमाणेच बंदी कायम ठेवण्यात आली असून, पर्यायी व्यवस्था म्हणून गणेशघाट ते कोळवणकर यांच्या घरामागील रॅम्पपर्यंत नदीलगतच्या जागेत एका बाजूला व्यापाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात बसण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच हा परिसर अवजड वाहनांसाठी ‘नो पार्किंग’ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बॅ. नाथ पै सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष विनय गुरव, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
सभेत मागील बैठकीतील निर्णयांचा आढावा घेण्यात आला. शिवाजीपथावरील आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी, बेशिस्तपणा आणि नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने या मार्गावर बाजार भरविण्यास बंदी कायम ठेवण्याचा निर्णय पुन्हा अधोरेखित करण्यात आला. पोलीस प्रशासन आणि स्थानिक व्यापारी संघटनांनीही या निर्णयाला पाठिंबा देत लेखी निवेदने दिल्याची माहिती प्रशासनाने सभागृहास दिली.
व्यापाऱ्यांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नदीलगतच्या जागेत तात्पुरती व्यवस्था करण्यास मंजुरी देण्यात आली. या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा प्रशासनाशी वाद घालणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. आवश्यक असल्यास पोलीस कारवाई करण्याचे निर्देशही नगराध्यक्षा ॲड. खलिफे यांनी दिले. तसेच आठवडा बाजाराची बैठक व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यासाठी सर्वेक्षण करून पुनर्रचना करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या.
पथदीप ठेकेदाराला १० दिवसांची मुदत
सभेत शहरातील पथदीप व्यवस्थेवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सध्या पथदीप देखभालीचे काम करणाऱ्या बी.ए.सी. इन्फ्राटेक प्रा. लि. आणि व्हिन्सी ग्लोबल प्रा. लि. या कंपन्यांच्या कामकाजाबाबत नगरसेवकांनी असमाधान व्यक्त केले. त्यानंतर संबंधित ठेकेदारांना कामात सुधारणा करण्यासाठी १० दिवसांची अंतिम मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत समाधानकारक सुधारणा न झाल्यास संबंधित ठेका रद्द करून पथदीप व्यवस्था पुन्हा नगर परिषदेमार्फतच चालविण्यात येणार असून, त्यासाठी एक लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.
विकासकामांसह अन्य महत्त्वाचे निर्णय
सभेत शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुमारे १९ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. तसेच कोदवली धरण ते जीएसआर साठवण टाकी समांतर जलवाहिनी उभारणे, मालमत्ता करात वाढ न करता चतुर्थ वार्षिक कर आकारणी, नगर परिषदेसाठी नवीन वाहन खरेदी, सार्वजनिक ठिकाणी विंधन विहिरी उभारणे आणि शहरातील मोकाट जनावरांवर नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आले.
आठवडा बाजारासह विविध विषयांवरील चर्चेत उपनगराध्यक्ष विनय गुरव, गटनेते ॲड. जमिर खलिफे, ॲड. राहुल तांबे, सुबोध पवार, सुलतान ठाकूर, सौरभ खडपे तसेच विविध पक्षांचे नगरसेवक व नगरसेविकांनी सहभाग घेत आपली मते मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button