राजापुरात ठाकरे शिवसेनेचे ‘रामरक्षा आंदोलन’; महाआरतीसह रामरक्षा पठण

राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराविरोधात निषेध; श्रद्धा रक्षणाचा निर्धार

राजापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख यांच्या आदेशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘रामरक्षा आंदोलन’ अंतर्गत राजापूर शहरातील खडपेवाडी येथील मारुती मंदिरात रविवारी महाआरती, रामरक्षा व मारुती स्तोत्र पठण करून आंदोलन करण्यात आले. प्रभू श्रीरामावरील श्रद्धा, रामभक्तांच्या भावनांचा सन्मान आणि राम मंदिरासाठी भक्तांनी दिलेल्या देणगीतील कथित गैरव्यवहाराविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.
जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर व उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मारुती मंदिर देवस्थानचे प्रमुख संदीप इंदुलकर, पिंट्या दुधवडकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी तालुकाप्रमुख कमलाकर कदम, शहरप्रमुख संजय पवार, तालुका संघटक प्राची शिर्के, उपतालुकाप्रमुख अभिजीत तेली, उपनगराध्यक्ष विनय गुरव, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष हातणकर, विभागप्रमुख विलास नारकर, शांताराम तळवडेकर, माजी नगरसेवक अनिल कुडाळी, नगरसेविका नेहा तानवडे, नलिनी शेलार तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात सामूहिक महाआरती करून रामरक्षा व मारुती स्तोत्राचे पठण करण्यात आले. तसेच प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना अर्पण करत रामभक्तांच्या श्रद्धेचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध व्यक्त करण्यात आला. रामाच्या नावावर होणाऱ्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
अयोध्येतील राम मंदिर हे कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा, विश्वास आणि अस्मितेचे प्रतीक असल्याने त्या पवित्र कार्यात कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला स्थान नसावे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. रामभक्तांच्या श्रद्धेचे संरक्षण, जनविश्वासाची जपणूक आणि धार्मिक मूल्यांचे संवर्धन हा ‘रामरक्षा आंदोलनाचा’ मुख्य उद्देश असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button