
तुकाराम मुंढे यांच्या अभिनंदनाचा ठराव; चिपळूण पंचायत समिती राज्यातील पहिली
चिपळूण : राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याची दखल घेत चिपळूण पंचायत समितीच्या मासिक सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. असा ठराव मंजूर करणारी चिपळूण पंचायत समिती ही राज्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.
पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर यांनी हा ठराव सभागृहात मांडला. राज्यातील नागरिकांचे आरोग्य उत्तम व सुदृढ राखण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची अन्न व औषध प्रशासन विभागात गरज असून, त्यांची बदली करू नये, अशी मागणी या ठरावातून करण्यात आली.
सभागृहातील सर्व सदस्यांनी या ठरावाला एकमताने मंजुरी दिली. सभापती सूर्यकांत खेतले आणि उपसभापती संदेश आयरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मासिक सभेत हा ठराव संमत करण्यात आला.
तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागात सुरू केलेल्या कारवाया आणि जनहिताच्या निर्णयांचे स्वागत करत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. या ठरावामुळे राज्यभरातील पंचायत समित्यांमध्येही अशा प्रकारचे ठराव मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे




