
रत्नागिरी शहरालगत खेडशी-लोहारवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन, नागरिकांच्यात घबराट
रत्नागिरी शहरालगतच्या ग्रामीण भागात वन्य प्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी खेडशी – लोहारवाडी परिसरात भरदिवसा लोकवस्तीजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणच्या मुख्य डीपी (ट्रान्सफॉर्मर) जवळ आणि रस्त्यालगत हा बिबट्या बराच वेळ शांतपणे बसून असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
लोहारवाडी परिसरातील झाडीझुडपांच्या आडोशाला असलेल्या महावितरणच्या डीपीजवळ हा बिबट्या दिसला. या मार्गावरून ये-जा करणार्या स्थानिक नागरिकांना आणि वाहनचालकांना अचानक बिबट्या दिसताच एकच खळबळ उडाली. काहींनी सुरक्षित अंतरावरून त्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावरही वेगाने प्रसारित होत आहे.




