ग्रामीण दरडग्रस्त भागात बीएसएनएल सेवा २० दिवसांपासून ठप्प;

ठाकरे सेनेचा बीएसएनएल कार्यालयावर धडक मोर्चा, आंदोलनाचा इशारा

खेड : तालुक्यातील धवडे, किंजळे, वडगाव, बिरमणी, कळमणी, कांदोशी तसेच परिसरातील गावांमध्ये बीएसएनएलची दूरध्वनी व मोबाईल सेवा गेल्या १५ ते २० दिवसांपासून पूर्णपणे ठप्प असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएल कार्यालयात धडक देत तीव्र नाराजी व्यक्त केली. सेवा तातडीने पूर्ववत न झाल्यास स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शिवसेना ठाकरे गटाचे खेड तालुकाप्रमुख सचिन निकम यांनी सांगितले की, दहिवली शेलारवाडी येथील दरड दुर्घटनेची घटना ताजी असताना दरडप्रवण भागातील दूरसंचार सेवा ठप्प राहणे अत्यंत गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एखादी दुर्घटना किंवा अन्य आपत्ती घडल्यास नागरिकांनी मदतीसाठी प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा किंवा नातेवाईकांशी संपर्क कसा साधायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“संपर्क यंत्रणा बंद असल्यामुळे एखाद्या आपत्तीमध्ये नागरिकांना वेळेत मदत मिळाली नाही आणि त्यातून जीवित किंवा वित्तहानी झाली, तर त्यास बीएसएनएललाही जबाबदार धरले जाईल,” असा इशारा सचिन निकम यांनी दिला.
याशिवाय, सेवा बंद असतानाही ग्राहकांनी केलेल्या रिचार्जच्या रकमेची आर्थिक भरपाई अथवा सेवेमध्ये तितकी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
ठप्प झालेली बीएसएनएल सेवा तातडीने सुरू न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन बीएसएनएल कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख सचिन निकम यांच्यासह किरण मोरे, सहदेव जाधव, प्रविण जाधव, वसंत जाधव, राकेश कदम, विकास जाधव, महिपत जाधव, तुळशीराम जाधव तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button