
मुंबई मराठी साहित्य संघाचाविलास कर्वे यांना उत्कृष्ट संगीत नाटककार पुरस्कार जाहीर
दापोली *मुंबई मराठी साहित्य संघाचा यावर्षीचा उत्कृष्ट संगीत नाटककार हा पुरस्कार दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील लेखक दिग्दर्शक ह. भ. प .विलास कर्वे यांना जाहीर झाला आहे.
मुंबई मराठी साहित्य संघाचे प्रमुख संस्थापक कै. अ.ना .भालेराव यांच्या स्मृतिदिनी ,
बुधवार दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ,मुंबई मराठी साहित्य संघ ,डॉ. भालेराव सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
साहित्य संघ मंदिर मुंबई या संस्थेमार्फत प्रतिवर्षी नाट्य क्षेत्रातील,विविध भागातील मान्यवरांना नाट्य सेवा गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतात. यावर्षीच्या श्री य.वि. भातखंडे पुरस्कृत डॉक्टर अ.ना .भालेराव स्मृती प्रीत्यर्थ ” संगीत नाटककार ” या पुरस्कारासाठी विलास कर्वे, गिम्हवणे तालुका दापोली यांची निवड झाल्याचे साहित्य संघाने जाहीर केले आहे..
विलास कर्वे यांनी,उत्सवी रंगभूमीवर सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ,ज्ञानियांचा राजा, आणि श्यामची आई या तीन संगीत बालनाट्यांचे लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण केलं आहे.तसेच महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेसाठी गोपिका रमणू स्वामी माझा, तमसो मा ज्योतिर्गमय, संभवामी युगे युगे या नाटकांचे लेखन दिग्दर्शन आणि सादरीकरण केलेलं आहे.
यापैकी गोपिका रमणू स्वामी माझा या नाटकास लेखनाचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांक आणि तमसो मा या ज्योतिर्गमय या नाटकाच्या लेखनासाठी द्वितीय क्रमांक त्यांना प्राप्त झालेला आहे . दापोली पंचक्रोशीतील एक सुप्रसिद्ध व्यावसायिक संगीत नाटक ,गायक नट आणि त्यांचे मुंबई मधील संगीत तपस्वी संगीत नाट्य गुरु यांचे चरित्र आणि गुरु शिष्य नाते यावर आधारित नाटक संगीत स्वर संगम, आणि श्री शिवमहापुराण ग्रंथातील एका पौराणिक कथेवर आधारित नाटक, संगीत शिवरंजनी , ही विलास कर्वे यांनी लिहिलेली दोन्ही नाटके लवकरच राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सादर होण्यासाठी तयार आहेत. हा पुरस्कार देणारी संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ,त्यांचे कमिटी मधील सर्व मान्यवर सदस्य यांचे श्री विलास कर्वे यांनी श्री देव गजानन यांचे चरणी नतमस्तक होऊन मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत . तसेच गेली अनेक वर्षे,श्री कर्वे यांचे पाठीशी उभे राहणारे त्यांचे नाट्य क्षेत्रातील गुरू, दापोली पंचक्रोशीतील तमाम कलाकार, गायक , गायिका,संगीतकार साथीदार ,तंत्रज्ञ, आणि रसिक प्रेक्षक यांचेही श्री कर्वे यांनी मनःपूर्वक आभार मानले असून हा पुरस्कार स्वतःचे कुटुंबीयांसह या सर्वांना समर्पित करीत असल्याचे श्री कर्वे यांनी सांगितले. हा पुरस्कार कोकणातील एका छोट्या गावातील छोट्या रंगकर्मी साठी,खूप प्रेरणादायी असून,गेली सुमारे दोन शतके समृद्ध असलेली आपली संगीत रंगभूमी अधिक तेजाने बहरास यावी, यासाठी कोकणात अधिक जोमाने कार्य करण्याची इच्छा विलास कर्वे यांनी व्यक्त केली आहे.




