रत्नागिरीतील भाटीमिर्‍या येथील धूपप्रतिबंधक बंधार्‍याचे काम सध्या वादाच्या भोवर्‍यात


रत्नागिरीतील भाटीमिर्‍या येथील धूपप्रतिबंधक बंधार्‍याचे काम सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. या कामात वैयक्तिक खासगी जमिनी जात असूनही प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतली जात नसल्याचा आरोप करीत भाटीमिर्‍या धूपप्रतिबंधक बंधारा संवर्धन कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीच्या पदाधिकार्‍यांसह ग्रामस्थांनी थेट पतन विभागाच्या कार्यालयावर धडक देत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या समस्येकडे प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी हेच निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि पाणलोट बंधारा उपविभागालाही देण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या मिया येथील धूपप्रतिबंधक बंधार्‍याचे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जमीन मालकांची कसलीही संमती न घेता खासगी जागांवरच हे काम थाटण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेले हे काम कृती समिती आक्रमक होणार आणि पतन कार्यालयावर धडक देणार असल्याचे समजताच घाईघाईने आणि हळूहळू पुन्हा सुरू करण्यात आले, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच कामाच्या ठिकाणी संबंधित खात्याचे कोणतेही जबाबदार अधिकारी उपस्थित राहात नसल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button