
सविता कोकजे, यांच्या ‘गुलदस्ता’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न!

रत्नागिरी :: येथील बागेश्री भजन मंडळ, छत्रपति नगरच्या महिला मंडळात लेखिका सविता शांताराम कोकजे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कौटुंबिक वातावरणात संपन्न झाला.
स्वांतसुखाय लेखन करणार्या कोकजे यांच्या समस्त मैत्रिणीनी पुढाकार घेऊन हा प्रकाशन सोहळा संपन्न केला.
सरस्वती मातेला शब्द सुरांनी वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रवचनकार, सौ. अंजली बर्वे यांनी पुस्तक परिचय करून दिला.
ज्येष्ठ मैत्रिणींच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. वैशंपायन, घारपुरे, घैसास आदी भगिनींनी रिबिन रेशीम बंध सोडून पुस्तकाचे प्रकाशन केले. कोकजे यांचा शाल, श्रीफळ, अभिनंदन पत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. पत्राचे लेखन, वाचन सौ. अंजली बर्वे यांनी केले. सौ. राधिका कुलकर्णी, साधना वायंगणकर यांनी शुभेच्छा मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना सविता कोकजे म्हणाल्या की, ‘माझे हे साहित्यिक अपत्य आहे, ते मला प्रिय आहे, आपण सर्वानी हा कार्यक्रम साजरा केलात, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याजवळ आज शब्द नाहीत. मी भारावून गेले आहे.’ कार्यक्रमाची प्रस्तावना, लेखिका परिचय, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ. वंदना घैसास यांनी केले.
यावेळी मंडळातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला मंडळाच्या जुन्या, नव्या सदस्या उपस्थित होत्या. कथा, लेख, व्यक्तिचित्रण, काव्य अशा विविध साहित्य फुलांचा हा गुलदस्ता स्पर्श प्रकाशन, राजापूर यांनी प्रकाशित केला आहे.




