सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर यशाचे ध्येय गाठा : डॉ. माधव बापट

डी. बी. जे. महाविद्यालयात करिअर संसद २०२६-२७ ची स्थापना

चिपळूण : कोणत्याही अपयशाला न घाबरता योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी आपल्या यशाचे ध्येय निश्चितच गाठू शकतो, असा विश्वास रत्नागिरी जिल्हा करिअर कट्टा प्राचार्य प्रवर्तक तथा डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी व्यक्त केला.

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत डी. बी. जे. महाविद्यालयात करिअर संसद २०२६-२७ ची स्थापना करण्यात आली. यावेळी डॉ. बापट यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली तसेच नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

करिअर संसद २०२६-२७ च्या मुख्यमंत्रीपदी कुमार शिवसंतोष लाड यांची निवड करण्यात आली. नियोजन मंत्रीपदी कु. श्रुती चव्हाण, कायदेशीर पालन मंत्रीपदी कु. सानिका परांजपे, सामान्य प्रशासन मंत्रीपदी कु. नक्षत्र कदम, माहिती व प्रसारण मंत्रीपदी कु. हिमानी नरेश केसरकर, उद्योजकता विकास मंत्रीपदी कु. काव्या कमलेश कोकाटे, रोजगार व स्वयंरोजगार मंत्रीपदी कु. समृद्धी चव्हाण, कौशल्य विकास मंत्रीपदी कु. राजरत्न श्रीधर कदम, संसदीय कामकाज राज्यमंत्रीपदी कु. रत्नेश रामाणे, तर महिला व बालविकास मंत्रीपदी कु. रिद्धी चाळके यांची निवड करण्यात आली. कु. शर्वरी सुनील घाग यांनी सदस्य म्हणून शपथ घेतली.

कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रा. सुनील भादुले व महाविद्यालय समन्वयक प्रा. ओंकार देशमुख उपस्थित होते. प्रा. भादुले यांनी प्रास्ताविकात करिअर कट्ट्याच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, परिश्रमाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन यशाची शिखरे गाठावीत, असे आवाहन केले. तसेच महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमाची आणि त्यातून मिळालेल्या यशाची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. सानिका परांजपे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button