रत्नागिरीत तरुणांकडून ४२ हजारांचे अमली पदार्थ जप्त


रत्नागिरी शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठीमागील परिसरात एक तरुण अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने थांबलेला असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून ३.५ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसह ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राहिल अजिज सुवर्णदुर्गकर (वय ३०, रा. राजीवडा बांध, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही कारवाई काल (२७ एप्रिल) सायंकाळी चारच्या सुमारास अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील बाजूस गगनगिरी मठ रस्त्यावर करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तरुण संशयास्पद हालचाली करत उभा असल्याचे आढळून आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. झडतीदरम्यान त्याच्याकडे पारदर्शक प्लास्टिक पिशवीत खाकी रंगाचा ब्राऊन हेरॉईन सदृश्य पदार्थ आढळला. पिशवीसह एकूण वजन ६.५ ग्रॅम होते, तर निव्वळ अमली पदार्थाचे वजन ३.५ ग्रॅम निघाले. त्याची अंदाजे किंमत ४२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात मद्यपान, दारू विक्री आणि गुटखा विक्रीविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत आहे. अंमली पदार्थांविरोधातही मोहिमा राबवल्या जात आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारची घटना उघडकीस आली होती. त्या वेळीही पोलिसांनी कारवाई केली होती. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी परिसरात नियमित गस्त, तपासणी आणि कडक कारवाईची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button