
अवैध उत्खनन आणि गौण खनिजांची चोरी रोखण्यासाठी कोकणात हायटेक ’वॉररुम’ उभारणार !
रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील अवैध उत्खनन आणि गौण खनिजांची चोरी रोखण्यासाठी राज्य सरकार, आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बडगा उगारणार आहे. संपूर्ण कोकण विभागातील गौण खनिजांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या ’रेलटेल’ कंपनीमार्फत एक हायटेक ’वॉररूम’ देखील तयार करण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले.
आमदार सुनील प्रभू यांनी विसर येथील अवैध उत्खनन आणि त्यातून झालेल्या हत्येच्या प्रकरणाबर विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. या वादळी चर्चेला उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी अवैध उत्खनन करणार्या माफियांची पाठराखण करणार्यांवर जरब बसवण्यासाठी सरकार कायद्यात मोठे बदल करणार असल्याचे स्पष्ट केले.
तहसीलदारांनी दंड ठोकल्यानंतर अपील करण्यासाठी सध्या भराव्या लागणार्या २५ टक्के रकमेची अट थेट ५० टक्के करण्याचा विचार ही समिती करेल, तसेच अवैध वाहतूक करणारी जप्त केलेली वाहने ७ दिवसांच्या आत शासनजमा करण्यासाठी वन विभागाच्या धर्तीवर नवीन नियमावली आगामी डिसेंबरच्या अधिवेशनात आणली जाईल, ज्याचा मोठा प्रभाव रत्नागिरीसारख्या किनारी व खनिजसंपन्न जिल्ह्यात अवैध वाहतुकीवर चाप बसवण्यासाठी होईल.




