
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे हायस्कूलची धोकादायक इमारत सील
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्यो कामादरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे धोकादायक ठरलेल्या तालुक्यातील कोळंबे येथील कमळजाबाई हायस्कूलची नवीन इमारत अखेर गुरुवारी पोलीस बंदोबस्तात सील करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सभापती शर्वरी वेल्ये यांनी समयसूचकता दाखवत सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, शासकीय अधिकारी आणि शाळा व्यवस्थापनाची तातडीची बैठक घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे शाळेच्या मागील बाजूस मोठे भूस्खलन झाल्याने इमारतीला मोठा धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच सभापती वेल्ये यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत संबंधित विभागाच्या अधिकार्यांना पाहणी करून त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. यानंतर गुरुवारी झालेल्यो बैठकीत इमारत विद्यार्थ्यांच्या वापरासाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्याने नवीन इमारत सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.




