
चिपळूण बुरूमतळी येथे फणस काढताना झाडावरून पडलेल्या ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू
घरासमोरील फणसाच्या झाडावरून फणस काढत असताना पडून गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल शिवरामराव चव्हाण (वय ६१, रा. सुमती निवास, बुरुमतळी, ता. चिपळूण) हे घरासमोरील फणसाच्या झाडावर फणस काढण्यासाठी चढले असता त्यांचा पाय घसरून ते खाली जमिनीवर पडले. या अपघातात त्यांच्या पायाला व कमरेला ’गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना मुलगा अमर अनिल चव्हाण यांने उपचारासाठी वालावलकर रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुणे वानवडी येथील कमांड हॉस्पिटल येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना तेथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.




