बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा उद्या सत्कार


रत्नागिरी : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या निवडणुकीत अनेक ज्येष्ठ व मान्यवर वकील निवडून आले आहेत. निवडून आलेल्या आलेल्या सदस्यांच्या सत्काराचे आयोजन रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे उद्या (४ जुलै) दुपारी २ वाजता रूम क्रमांक २०६ मध्ये करण्यात आले असल्याची माहिती रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माहिती देताना ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने तरुण वकील सहाय्य निधी निर्माण करून तरुण वकिलांना सुरवातीच्या काळात मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याचा महाराष्ट्र सरकार व बार कौन्सिलने गांभीर्याने विचार केला पाहिजे. वकील संरक्षण कायदा त्वरित संमत करणे, वकिलांच्या विरुद्धच्या तक्रारीचा जलदगतीने निपटारा झाला पाहिजे, दक्षता समिती गठित करणे वेल्फेअर फंड योजना अधिक सुटसुटीत करणे, वकिलांना शासनाकडून चेंबरसाठी जागा उपलब्ध करून देणे, न्या अमानुला यांच्या सूचनेप्रमाणे निवारण समित्या स्थापन करणे, अशा अनेक प्रलंबित मागण्या यानिमित्ताने या सदस्यांच्या समोर ठेवून त्या मार्गी लागतील असा प्रयत्न बार असोसिएशन करेल.”
सत्कार सोहळ्याला ॲड पारिजात पांडे, ॲड. उदय वारुंजीकर, ॲड. विठ्ठल कोंडे देशमुख, ॲड. विवेक घाटगे, ॲड. अहमदखान पठाण, ॲड. रंजना भोसले, ॲड. माधवी पोतदार आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सत्कार सोहळ्याला जोडून दुपारी १.३० वाजता न्यायालय ते जयस्तंभ या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम प्रधान जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव व इतर मान्यवर यांचे उपस्थितीत होणार आहे.

या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष ॲड. निनाद शिंदे, ॲड. शाल्मली आंबुलकर, कोषाध्यक्ष ॲड. अवधूत कळंबटे, सहसचिव ॲड. राहुल चाचे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button