संगमेश्वरात गणेश घाट परिसरात वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याने खळबळ


संगमेश्वर येथील गद्रे यांच्या समोरील गणेश घाट परिसरात दवाखान्यांमधील वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या कचर्‍यामध्ये सलाईनच्या बाटल्या, सिरींज, इंजेक्शनच्या सुया, औषधांच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या तसेच इतर वैद्यकीय साहित्याचा समावेश होता.
अशा प्रकारचा जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने अपघात होण्याबरोबरच संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ही बाब जागरूक नागरिक अमोल शेट्ये यांच्या निदर्शनास आली. त्यांनी घटनास्थळाचे छायाचित्रे काढून याबाबत माहिती दिली. त्यानंतर अजिंक्य राज सुर्वे यांनी तातडीने ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून ग्रामसेवक आणि कर्मचारी अनिल तांबे यांना घटनास्थळी नेऊन प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून दिली.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत ग्रामपंचायत नावडीने परिसरातील सर्व दवाखाने व मेडिकल चालकांना वैद्यकीय कचरा उघड्यावर न टाकता त्याची नियमांनुसार योग्य विल्हेवाट लावण्याबाबत लेखी नोटीस बजावली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button