
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे सर्वपक्षीय आक्रमक
दापोली तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तालुका कॉंग्रेसच्या पुढाकाराने सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी दापोली पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. मागील आठ दिवसांत तालुक्यात पोक्सो कायद्यांतर्गत चार गुन्हे दाखल झाले आहेत.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींवरील अत्याचारांच्या घटनांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशा घटनांचा विद्यार्थिनींच्या मानसिकतेवर आणि भविष्यातील आयुष्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना, पालक आणि प्रशासनाची संयुक्त बैठक बोलावून जनजागृती मोहीम राबवावी, शाळा-महाविद्यालयं परिसरात सुरक्षा वाढवावी आणि विद्यार्थिनींमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.




