
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ परिसरात बिबट्याचा धुमाकूळ एक वर्षाच्या पाड्यावर हल्ला
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-धोंगडवाडी परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा वाढल्याचे समोर आले असून, शनिवार दि. २७जून रोजी एका वर्षाच्या पाड्यावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरातील पशुपालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुरळ-धोंगडवाडी येथील शेतकरी मंगेश सीताराम जाधव यांच्या मालकीच्या सुमारे एक वर्षाच्या पाड्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात पाड्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकरी मंगेश जाधव यांनी वनविभागाने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि शासनाच्या नियमानुसार योग्य ती आर्थिक नुकसान भरपाई मंजूर करावी, अशी मागणी केली आहे.




