
दापोली-खेड मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; दीड वर्षांची चिमुकली गंभीर
दापोली-खेड मार्गावरील नवानगर येथे शनिवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दीड वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली असून अन्य काही प्रवाशांनाही दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०४ डीवाय ६८६३ क्रमांकाची कार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचा अंदाज चुकला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एमएच १२ केजे १०२७ क्रमांकाच्या कारला समोरासमोर जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये दीड वर्षांच्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातामुळे दापोली-खेड मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करत अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.




