
रत्नागिरीत अवैध गोवंश मांसविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; ५१.५ किलो मांसासह एकाला अटक
रत्नागिरी : मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष बंदोबस्तादरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवैध गोवंश मांसविक्रीविरोधात धडक कारवाई करत उद्यमनगर परिसरातून एका संशयिताला अटक केली. या कारवाईत ५१ किलो ५०० ग्रॅम संशयित गोवंश मांस, एक दुचाकी, डिप फ्रीजरसह एकूण १ लाख ६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव लियाकत शौकत दावत (वय ४८, रा. लांजेकर नगर, उद्यमनगर, रत्नागिरी) असे आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली २६ जून रोजी मोहरम सणानिमित्त जिल्हाभर विशेष गस्त आणि बंदोबस्त सुरू होता. त्यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक उद्यमनगर परिसरात गस्त घालत असताना लांजेकर नगर येथे लियाकत दावत याच्याकडे विनापरवाना गोवंश प्राण्यांचे मांस विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. पशुधन विकास अधिकारी यांच्या प्राथमिक पडताळणीनंतर ५१.५ किलो संशयित गोवंश मांस, डिप फ्रीजर आणि दुचाकीसह एकूण १ लाख ६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३२५ तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम, २०१५ आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, महिला सहायक पोलीस फौजदार स्वाती राणे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, गणेश सावंत, सत्यजित दरेकर आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.




