दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते’; नागपूरमध्ये दाखल होताच उद्धव ठाकरेचं मोठं विधान


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका रांगेतच या दोन्ही नेत्यांच्या सीट होत्या.

दोघेही विंडो सीटजवळ बसले होते. या प्रवासामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगली. पण हा निव्वळ योगयोग असल्याची प्रतिक्रिया दोन्ही बाजूंच्या काही नेत्यांकडून देण्यात आली. तरीही एकाच विमानातून केलेल्या एकत्रित प्रवासाची मोठी चर्चा झाली. उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांनी स्वागताला पोहोचलेल्या शिवसैनिकांना थोडा वेळ संबोधित केलं.

पक्षातील सहा खासदारांनी साथ सोडल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता थेट फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जात सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ते २७ जून ते २९ जून या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले असून आज त्यांची पहिली सभा यवतमाळमध्ये पार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विमानतळावर शिवसैनिकांनी केलेल्या स्वागतानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले…

“शिवसेना काय आहे, हे विरोधकांच्या आकलनापलीकडचं आहे. दोन-चार गद्दार फोडले म्हणून शिवसेना संपेल, असा त्यांचा गैरसमज आहे. मात्र माझ्यासोबत तुमच्यासारखे कट्टर, निष्ठावंत शिवसैनिक आहेत, तोपर्यंत कोणाच्याही कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही,” असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.यावेळी त्यांनी नागपुरात लवकरच भव्य शिवसैनिक मेळावा घेणार असल्याची घोषणाही केली. “आज मी यवतमाळला जात आहे. पण पुन्हा नागपुरात येणारच. कस्तुरचंद पार्कवरील सभेप्रमाणे पुन्हा एकदा प्रचंड मेळावा घेऊ. सरकारने तेवढं मोठं मैदान शिल्लक ठेवलं असेल, तर त्याच मैदानावर सभा घेऊ,” असे ते म्हणाले.

पुढील महिन्यात नागपुरात मोठा शिवसैनिक मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले. “तुमच्या प्रेमामुळे शिवसेना आहे आणि राहणार आहे. शिवसेनेच्या मुळावर जो कोणी येईल, त्याला राजकीय उत्तर दिल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button