डेरवण मार्गाची खड्ड्यांनी चाळण; जांभ्याची खडी-माती टाकून तात्पुरती मलमपट्टी

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा डेरवण मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर वालावलकर रुग्णालय, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, विद्यापीठ तसेच विविध शैक्षणिक संस्था असल्याने दिवसभर विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि अन्य वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

खड्ड्यांबाबत वारंवार तक्रारी व बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर डांबरीकरण करण्याऐवजी जांभ्याची खडी आणि माती टाकून खड्डे बुजविले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पावसामुळे काही तासांतच ही खडी-माती वाहून जात असून खड्डे पुन्हा जैसे थे होत आहेत. त्यामुळे ही दुरुस्ती केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्यावर पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रुग्णवाहिकांच्या वाहतुकीवरही परिणाम होत असून रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही दररोज या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी रस्त्याचे दर्जेदार व कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. तसेच धोकादायक ठिकाणी गतिरोधक बसविण्याचीही मागणी होत आहे. एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button