
कुडाळमध्ये सिमेंट मिक्सर ट्रक उलटला; चालकाचा जागीच मृत्यू
कुडाळ एमआयडीसी येथील महानंद पशुखाद्य कारखाना समोरील धोकादायक वळणावर सिमेंट काँक्रीट मिक्सरला गुरुवारी सायं. ४ वा. अपघात झाला. या अपघातात मिक्सर ट्रक चालकाला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.मिक्सर ट्रक रस्त्यालगत पलटी झाल्याने केबिनचा चालकाच्या बाजूने चेंदामेंदा झाला. त्यामुळे चालकाला केबीनबाहेर घेताना अडचण आली. जवळपास पाऊण तासानंतर पोलिस व अग्निशमन दलाच्या मदतीने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. धीरू शोभनाथ यादव (वय २४, सध्या रा. कुडाळ, मूळ रा. गोरहाई, सतना, मध्य प्रदेश) असे मयत चालकाचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली.
एमआयडीसीतील प्लांटमध्ये सिमेंट काँक्रीट भरून मिक्सर ट्रक कुडाळ शहरात येत होता. महानंद पशुखाद्य कारखान्यासमोरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिक्सर ट्रक रस्त्यालगत उलटला. या दुर्घटनेत चालक केबिनमध्ये अडकून पडला. अपघातात गंभीर दुखापत झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.




