
शहरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये महानगर गॅसची बिले भरण्याची सुविधा उपलब्ध
सुमारे १०,००० ग्राहकांना होणार मोठा फायदा
रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातील महानगर गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. आता शहरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये महानगर गॅसची मासिक बिले भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, या सुविधेमुळे शहरातील सुमारे १०,००० महानगर गॅस ग्राहकांना मोठा लाभ होणार आहे.
जसजसे महानगर गॅसचे ग्राहक शहराच्या विविध भागांमध्ये वाढत गेले, तसतसे विद्यमान बिल भरणा केंद्रांपर्यंत जाणे नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत होते. नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन महानगर गॅसने भारतीय डाक विभागाशी संपर्क साधून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून बिल भरण्याची सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
भारतीय डाक विभागाचे व्यापक नेटवर्क आणि नागरिकांशी असलेले दैनंदिन संपकाचे नाते लक्षात घेता, या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. त्यानुसार भारतीय डाक विभाग आणि महानगर गॅस यांच्यामध्ये नुकताच अधिकृत सामंजस्य करार करण्यात आला असून या सुविधेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला आहे. सदर करारावर भारतीय डाक विभागाच्या वतीने रत्नागिरी विभागचे अधीक्षक डाकघर श्री. ज्ञानेश कुलकर्णी आणि महानगर गॅस लिमिटेडच्या वतीने जीए हेड श्री. आशिष प्रसाद यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारामुळे आता रत्नागिरी शहरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये महानगर गॅसची मासिक बिले स्वीकारली जाणार असून याचा थेट फायदा स्थानिक ग्राहकांना मिळणार आहे.
पोस्ट ऑफिसच्या या विस्तृत नेटवर्कमुळे महानगर गॅस ग्राहकांना बिल भरण्यासाठी आता दूरवर जाण्याची आवश्यकता उरलेली नाही. परिणामी, ग्राहकांचा प्रवासाचा वेळ आणि पैशांची मोठी बचत होणार असून त्यांच्या दैनंदिन व्यवहारात अधिक सुलभता निर्माण होणार आहे.
दरम्यान, भारतीय डाक विभागामार्फत नागरिकांना आधीच स्पीड पोस्टद्वारे देश-विदेशात पार्सल पाठविणे, पार्सल पिकअप सेवा, टपाल जीवन विमा, विविध बचत योजना, लॉजिस्टिक सेवा, पासपोर्ट सेवा यांसारख्या विविध नागरिक-केंद्रित सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता या विविध सेवांमध्ये महानगर गॅस बिल भरणा सेवेचीही भर पडल्यामुळे नागरिकांच्या संबंधित सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याच्या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील सर्व महानगर गॅस ग्राहकांनी या नवीन सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर श्री. ज्ञानेश कुलकर्णी आणि महानगर गॅसचे जीए हेड श्री. आशिष प्रसाद यांनी संयुक्तरित्या केले आहे.
तू




