जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २८ अशासकीय सदस्यांची होणार नियुक्ती३० दिवसात अर्ज करण्याचे आवाहन


रत्नागिरी, दि. १० ):- ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ अन्वये ग्राहकांच्या हक्कांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जिल्हा स्तरावर ‘ग्राहक संरक्षण परिषद’ गठीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या परिषदेतील अशासकीय सदस्यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने, पुढील ३ वर्षांच्या कालावधीसाठी १० विविध प्रवर्गांमधून एकूण २८ अशासकीय सदस्यांची नव्याने निवड केली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी पूर्ण भरलेले लेखी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात आजपासून ३० दिवसांच्या आत सादर करायचे आहेत. मुदतीनंतर प्राप्त होणारे किंवा अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी कळविले आहे.
शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या नियमानुसार या परिषदेवर लोकप्रतिनिधी, व्यावसायिक आणि विविध सामाजिक क्षेत्रांतील प्रतिनिधींची निवड केली जाते. ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी: १० जागा, स्थानिक स्वराज्य संस्था: जिल्हा परिषद (२), नगरपरिषद (२), पंचायत समिती (२), व्यावसायिक व उद्योग: व्यापार व उद्योग क्षेत्र (२ प्रत्येकी १), पेट्रोल व गॅस विक्रेते (२), वैद्यकीय व्यावसायिक (२), संस्था व घटक: कृषी उत्पन्न बाजार समिती (२), शाळा/महाविद्यालये (२), शेतकरी प्रतिनिधी (२)
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाची माहिती
अर्जाचा विहीत नमुना (परिशिष्ट-अ), आवश्यक कागदपत्रांची यादी (परिशिष्ट-ब) आणि संबंधित शासन निर्णय जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ www.ratnagiri.nic.in वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जासोबत जोडण्यात येणारी कागदपत्रे ही केंद्र किंवा राज्य शासनाच्या राजपत्रित अधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेली असणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button