
‘जैतापुरचा राजा’च्या मावळ्यांनी आम्बोळगड किल्ला केला चकाचक
किल्ले संवर्धन उपक्रमांतर्गत तीन तासांत साफसफाई; २०२३ मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा मान


राजापूर : ऐतिहासिक वारसा जपण्याच्या उद्देशाने ‘जैतापुरचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने राजापूर तालुक्यातील दुर्लक्षित आम्बोळगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अवघ्या तीन तासांत किल्ल्याचा बहुतांश परिसर स्वच्छ करून ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

सन २०२३ मध्येही मंडळाने आम्बोळगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबविली होती. या उपक्रमामुळे दुर्लक्षित असलेला हा ऐतिहासिक किल्ला प्रकाशझोतात आला होता. विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या स्पर्धेत मंडळाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला होता. त्यानंतर मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते मंडळाचा सन्मान करण्यात आला होता.

यंदाही त्याच उत्साहाने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी किल्ले संवर्धन उपक्रमांतर्गत आम्बोळगड किल्ल्यावर श्रमदान केले. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात वाढलेले रान, झुडपे आणि गवत कापून हटविण्यात आले. तसेच परिसरातील पालापाचोळा गोळा करून किल्ल्याचा बहुतांश परिसर स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेदरम्यान आम्बोळगड येथील ज्येष्ठ ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते विश्वासभाई करगुटकर हे आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते. त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
सामाजिक उपक्रमांची मालिकाच
‘जैतापुरचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षीही विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जात असून, किल्ले संवर्धनाचा उपक्रमही त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग आहे.
ऐतिहासिक किल्ले ही पुढील पिढ्यांसाठीची अमूल्य ठेवा असून त्यांचे संवर्धन करण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ‘जैतापुरचा राजा’ मंडळाने राबविलेल्या या मोहिमेतून त्याचेच उदाहरण निर्माण झाले आहे.
मोहिमेत ‘राजाचे सेवक’ सहभागी
या स्वच्छता मोहिमेत मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, सचिव राकेश दांडेकर, उपाध्यक्ष श्रीकृष्ण राऊत, खजिनदार सुनील करगुटकर, सहसचिव प्रसाद माजरेकर, तसेच परेश भाटकर, सुहास पवार, बाबुली पेडणेकर, संदीप चव्हाण, गजानन करमळकर, महेश नारकर, स्वप्निल सोगम, पिंट्या पालकर, प्रियांका नार्वेकर, प्रकाश नार्वेकर, विश्वासभाई करगुटकर, धनेश्वर खाडये, अशोक आम्बोळकर आणि जितेंद्र भोईर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते




