अमित कदम यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार

खासदार नारायण राणे यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे अमित कदम यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी

फोंडाघाट
आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात भारताचा झेंडा अभिमानाने फडकवत Mr. Universe स्पर्धेत सिल्वर आणि ब्रॉन्झ पदक पटकावणारे कोकणी बॉडीबिल्डर अमित अनिल कदम याचा आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज ओम गणेश बंगल्यावर सत्कार करण्यात आला.


देशासाठी आणि संपूर्ण जिल्हावासियांची मान अंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात अभिमानाने उंचवणाऱ्या हरकुळ येथील अमित कदम यांच्या या यशा नंतर चाहते, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच देशवासियांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. अनेकांनी तिरंगा हातात घेऊन अमित कदम यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा आनंद साजरा केला.


अनेक वर्षांची मेहनत, कठोर प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली आणि जिद्दीच्या जोरावर अमित कदम यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या यशामुळे कोकणातील आणि महाराष्ट्रातील तरुणांना मोठी प्रेरणा मिळाली आहे.
अमित कदम यांनी सांगितले की, “हे यश माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या देशवासियांचे प्रेम, कुटुंबाचे आशीर्वाद आणि सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी हे यश मिळवू शकलो. हे पदक मी भारताला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करतो.”
दरम्यान आज कणकवलीतील ओम गणेश बंगल्यावर पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतल्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अमित कदम याचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी फोंडा घाट येथील बबन हळदीवे, माजी सभापती सुजाता हळदीवे, विश्वनाथ जाधव,हेमंत फोंडेकर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणाचा आणि भारताचा गौरव वाढवणाऱ्या अमित कदम यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button