
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाच्या रुंदीकरणाला अखेर मुहुर्त; ५५ कोटींचा निधी मंजूर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेडजवळील भोस्ते घाट हा गेल्या काही वर्षांत वारंवार होणार्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अखेर महत्त्वाचा निर्णय घेत घाटातील धोकादायक वळणांचा सुमारे ५५० मीटरचा रस्ता रुंद करण्याचे काम हाती घेतले असून यासाठी तब्बल ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भोस्ते घाटात अरुंद रस्ता, तीव्र वळणे, वेगवान वाहतूक आणि पावसाळ्यात निर्माण होणारी निसरडी परिस्थिती यामुळे अनेक गंभीर अपघात घडले आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला असून शेकडो वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे भविष्यात वाहतुकीचा ताण कमी होऊन अपघातांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. घाटातील रस्ता अधिक रुंद झाल्यानंतर अवजड वाहने आणि इतर वाहनांना सुरक्षितरित्या मार्गक्रमण करणे शक्य होणार आहे. मात्र, दुसरीकडे मान्सून अगदी तोंडावर असताना सुरू झालेल्या या कामामुळे नव्या सुरक्षाविषयक चिंता समोर आल्या आहेत. रुंदीकरणासाठी रस्त्यालगत मोठ्याप्रमाणात माती आणि भराव टाकण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे ही माती रस्त्यावर वाहून आल्यास घाटातील मार्ग अधिक निसरडा होण्याची शक्यता स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
www.konkantoday.com




