रायपाटण ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था; रुग्णालयच पडले आजारी…

जीर्ण इमारती, गळके छत, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पडझड; प्रश्न सुटला नाही तर आंदोलनाचा इशारा माजी सरपंच विलास गांगण यांचा सवाल


राजापूर :
शासनाकडून आरोग्य क्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जात असून दर्जेदार आरोग्यसेवेची आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे चित्र राजापूर तालुक्यातील रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दिसून येत आहे. जीर्ण झालेल्या इमारती, गळके छत, पडझड झालेली कर्मचारी निवासस्थाने आणि अपुऱ्या वैद्यकीय सुविधा यामुळे रुग्णांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्या तातडीने सोडविल्या नाहीत, तर जनतेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा रायपाटणचे माजी सरपंच विलास गांगण यांनी दिला आहे.
रायपाटण परिसरात सुमारे अर्धशतकापूर्वी जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली होती. यासाठी रायपाटणचे सुपुत्र स्वर्गीय हनुमंत गणेश कुलकर्णी यांनी भूदान करून जागा उपलब्ध करून दिली होती. तसेच त्या काळात लोकवर्गणीतून पाच हजार रुपयांची देणगीही दिली होती. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारती उभारण्यात आल्या. पुढे महाराष्ट्र शासनाने त्याच आवारात ग्रामीण रुग्णालय सुरू केले, तर काही वर्षांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले.
मात्र, आज जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जुन्या इमारती पूर्णपणे जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. अनेक इमारतींना मोठ्या प्रमाणात गळती लागली असून काही ठिकाणी कौले कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू असलेल्या इमारतीत अनेक वर्षांपासून पावसाळ्यात गळती होत असल्याने रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या सुमारे २० ते २२ निवासी खोल्यांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्या वापरण्यायोग्य राहिलेल्या नाहीत. या इमारती आज भग्नावस्थेत असून परिसर ओसाड झाल्याचे चित्र आहे.
कोविड-१९ काळात उभारण्यात आलेले ऑक्सिजन निर्मिती केंद्रही सध्या निष्क्रिय अवस्थेत असल्याची चर्चा आहे. त्याचा प्रभावी वापर होत नसल्याने उपलब्ध सुविधांचा लाभ रुग्णांना मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. तसेच गंभीर स्वरूपाच्या बहुतांश रुग्णांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवावे लागत असल्याने विशेषतः महिला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे.
रायपाटण ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था लक्षात घेऊन शासनाने तातडीने जीर्ण इमारतींची दुरुस्ती, नवीन निवासी इमारतींची उभारणी, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि निष्क्रिय यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.
: सेवाभावी व्यक्तींच्या योगदानाला तडा
रायपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी स्वर्गीय हनुमंत गणेश कुलकर्णी यांनी भूदान करून जागा उपलब्ध करून दिली होती. तसेच प्रारंभीच्या इमारतींचे बांधकाम तळवडे गावचे सुपुत्र अभियंता स्वर्गीय सीताराम वामन प्रभू देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. आज या इमारतींची झालेली दुरवस्था पाहून या सेवाभावी व्यक्तींच्या कार्यालाच तडा गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या योगदानाचा सन्मान राखत रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचा सर्वांगीण कायापालट करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button